गौतम बुद्ध ......विश्वाला शांती आणि एकतेचा संदेश देणारा भारतीय संस्कृतीचा एक ध्रुव तारा ! जातक कथांनुसार बुद्धांनी 486 इसापूर्व म्हणजे आजपासून जवळ जवळ 2500 वर्षांपूर्वी कुशीनगर मध्ये वयाच्या 80 व्या वर्षी देहत्याग केला आणि त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झाला त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचा देह रेशमाच्या पट्या आणि उच्च प्रतीची रुई गुंडाळून सुगंधीत तेलाच्या एका मोठ्या काईली मध्ये ठेवण्यात आला होता . सगळे शिष्य जमल्यानंतर चंदनाच्या लाकडांनी बनलेल्या चितेवर त्यांचा दाहसंस्कार करण्यात आला . महावंश पीटकात वर्णन केल्या प्रमाणे बुद्धांच्या दाहसंस्कारानंतर त्यांच्या अस्थी 4 भागात विभाजित केल्या गेल्या ज्या कोलीया , मल्ल , शाक्य आणि वैदिक ब्राह्मण अश्या चार कुळांना त्या सोपवण्यात आल्या.
या घटनेच्या जवळपास 250 वर्षानंतर मौर्य साम्राज्याच्या सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी ते चारी रांजण एकत्र केले आणि त्यांच रूपांतर 80000 करंड्यामध्ये केलं या मध्ये सुवर्ण , चंदन , चांदी आणि स्पटिक करंड्यांचा समावेश होता हे करंडे अखंड देशात आणि देशाबाहेर पाठवले गेले जिथे त्यांच्यावर स्तूप बांधून ते सुरक्षित ठेवण्यात आले.असाच एक स्तूप ब्रिटिश काळात कोल्हापूरात ही सापडला होता 28 ऑक्टोबर 1877 ची ही गोष्ट टाऊन हॉल परिसरातील खारळा बंगल्यापाशी असणाऱ्या बागेत एका बंगल्याच काम सुरू होतं , ज्या साठी तुरुंगातील कैद्यांना कामाला लावलं गेलं होतं . बांधकामासाठी मातीची गरज होती म्हणून मजुरांनी तिथेच जवळ असणाऱ्या एका बाभळीच्या झाडा खाली खोदायला सुरू केले . हे बाभळीच झाडं जवळ जवळ100 फूट व्यासाच्या एका गोल चौथऱ्यासारख्या दिसणाऱ्या माती आणि विटांच्या ढिगाच्या वर उभं होतं . खोदकाम करत असताना त्या मजुरांना भाजीव विटा सापडल्या त्यांचा अंदाज होता की ही कट्ट्यासारखी दिसणारी संरचना जमिनीत जास्त खोल गेली नसावी .पण जसं जस खोदकाम खोल जात होतं तसं तशी ती संरचना अजून खोल दिसत होती . मजुरांनी खुदाई करत असताना त्याची पार एका दगडाच्या पेटीवर आदळली त्यांनी ती बाहेर काढली .
पंचगंगा नदीत मिळणाऱ्या लाल जांभ्या दगडापासून ती बनवली होती त्याच्या झाकणावर 'ब्रम्हस् दानम धर्म: गुत्येनं कारीतम्' अशी अक्षर कोरली होती . तिच्या आत एक पारदर्शक स्पटिक करंडा होता ज्या मध्ये गौतम बुद्धांच्या अस्थी ठेवल्या होत्या पण दुर्दैवाने त्या पेटीवर बसलेल्या घावामुळे तो फुटला होता आणि अस्थी त्या पेटित विखरुल्या होत्या एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे च्या ब्राम्ही लिपी तज्ञांच्या म्हणण्यानुसार हा स्तूप बिहार, अमरावती स्तुपांइतका च प्राचीन म्हणजेच जवळ जवळ 2000 वर्षांपूर्वीचा असावा आणि सांची स्तुपासरखी याची रचना असावी . बुद्धांच्या अस्थीं असणारा एक स्पटिक करंडा कोल्हापूरात सापडल्याची माहिती ब्रिटीश दस्तांमध्ये सुद्धा मिळते . या बरोबरच बुद्ध विहार ध्यान गुंफा ही याच परिसरात असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती .या काळातील अनेक वस्तू शिवाजी पुलाचे बांधकाम सूरु असताना ही सापडल्या होत्या ज्या मध्ये बुध्द भिक्षूंच भिक्षा पात्र काही कांस्य आणि सुवर्णाची नाण्यांचा समावेश होतो. पण त्या संबंधित म्हणावा तितका शोध पुढे कधी झालाच नाही . ज्या ठिकाणी हा स्तूप सापडला होता ते ठिकाण आज जयंती नाला विल्सन पुलाला जिथे मिळतो त्या आसपास येते. जिथे आज दुर्गंधी , घाण आणि कचऱ्याच्या ढिगा व्यतिरिक्त आपल्याला काहीच आढळत नाही .साऱ्या विश्वाला एक नवीन ओळख देणाऱ्या गौतम बुद्धांना आज त्यांचाच देश विसरत चालला आहे !


No comments:
Post a Comment