Wednesday, May 19, 2021

भावसिंगजी रस्ता,हे भावसिंगजी कोण होते??

   


              जुन्या राजवाड्यातून निघालेला हा रस्ता थेट नवीन राजवाड्याला जाऊन भिडलेला. शहरातलं जे काही महत्त्वाचं ते या रस्त्यावरच. रस्त्याचं नाव भावसिंगजी रस्ता है भावसिंगजी कोण? हा अनेकांच्या मनात येणारा प्रश्न व असतील कोणीतरी महाराजांच्या घराण्यातील असंच सुचणारं उत्तर मात्र भावसिंगजी महाराजांच्या घराण्यातील कोण नव्हते, तर ते शाहू महाराजांचे मित्र होते. मित्राचं नाव या रस्त्याला देऊन त्यांनी मैत्रीची स्मृती जागवली व या रस्त्याची नवी ओळख भावी पिढीला करून दिली.


काळाच्या ओघात या रस्त्याचं नाव भाऊसिंगजी रस्ता असं झालं आणि तेच नाव पुढं कागदपत्रांवरही रूढ झालं. भावसिंगजी हे भावनगरचे राजे. लहानपणी ते व शाहू महाराज सर स्टुअर्ट फ्रेजर या शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली एकत्र शिकले व एकमेकांचे जीवलग दोस्त बनून गेले. १३ जुलै १९१९ रोजी भावसिंगजी यांचे निधन झाले व शाहू महाराजांनी आपल्या मित्राचे नाव या मुख्य त्याला समारंभपूर्वक दिले.


जुन्या राजवाड्याच्या नगारखान्यापासून या रस्त्याची सुरवात. सुरवातीलाच लिप्टन माने यांचं चहापुडीचे दुकान. शेजारी सरदार मानकऱ्यांचे कपडे शिवणाऱ्या इंगळे यांचं शिलाईचं दुकान. या दुकानासमोरचा रस्ता रविवार वेशीकडे व शेजारचा रस्ता खर्डेकर बोळाकडे. सरलष्कर खर्डेकरांचा वाडा. या बोळात एका वेळी दोन माणसं जाऊ शकणार नाहीत एवढ्या रुंदीचा हा बोळ पुढे कार्तिक स्वामींच्या देवळापर्यंत जाऊन पोहोचलेला. खर्डेकरांच्या वाड्यात विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या खोल्या.


भावसिंगजी रस्त्यावर नगरशेठ यांची चार मजली लाकडी देखणी इमारत. प्रसंगी संस्थानिकांना उसनवार पैसे देण्याची ऐपत असलेले हे नगरशेठ. पुढे नालबंदाचा वाडा घोड्यांच्या खुरांना नाला मारण्याचे काम करणारे हे नालबंद. वाड्यासमोरच अरुंद तोंडाची हुजूर गल्ली. आतले सगळे रस्ते काटकोनातले; पण केवळ एक सायकलस्वार जाऊ शकेल एवढ्याच रुंदीचे. या बोळात भावसिंगजी रस्त्यावरून आत गेलं की थेट शिवाजी रोडवर (त्यावेळचा विल्सन रोड) बाहेर पडण्याची सोय.


हुजूर गल्लीच्या कोपऱ्याला विजय भवन मिठाई दुकानाच्या दारात एक तुरबत होती. या तुरीची दंतकथा अशी की, घुडणपीर बाबांच्या घोड्याची ही तुरबत. ही तुरबत वाहतुकीला मोठा अडथळा ठरायची पण तुरबत काढायची म्हणजे भावनिक प्रश्न म्हणून वर्षानुवर्षे तुरबत रस्त्यावरच राहिलेली. १९७२ साली तत्कालीन नगराध्यक्ष एन. डी. जाधव यांच्या कारकिर्दीत एका रात्रीत विशेष मोहीम आखून तुरबत हलवली गेली. विरोध होऊ नये म्हणून या रस्त्यावर राहणाऱ्यांच्या घराला त्या रात्री कड्या घालण्यात आल्या. भवानी मंडप ते शिवाजी पुतळा हा रस्ता पोलिसांनी काही वेळासाठी पूर्ण बंद ठेवला व तुरबत हलविली गेली व त्या ठिकाणी डांबरी रस्ताही केला गेला. सकाळी भावसिंगजी रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ चालू झाली. लोकांना रस्त्यावर काही तरी वेगळं जाणवलं; पण नेमकं काय वेगळं आहे हे लवकर कळालं नाही व तुरबत काढण्याच्या कारवाईचे पडसादही उमटले नाहीत.


भावसिंगजी रस्त्याच्या मध्ये विल्सनचा पुतळा होता. त्यामागे घुडणपीर दर्गा, प्राचीन परंपरा असलेला. त्यासमोर गवळ्यांचं सोडा लेमनचं दुकान, विल्सनचा पुतळा हे पारतंत्र्याचे प्रतीक मानून स्वातंत्र्यसैनिकांनी हा पुतळा विद्रुप केला व त्या ठिकाणाहून पुतळा हटविण्यात आला व शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभा करण्यात आला. या पुतळ्याजवळच फेरीस मार्केट म्हणजे आताचं शिवाजी मार्केट, समोर बाँबे लॉज. या लॉजला मोठी आग लागली. असं म्हणतात की दोन दिवस ही आग धुमसत राहिली.


आता त्या ठिकाणी युनायटेड वेस्टर्न बँकेची इमारत आहे. विल्सन चौकातनं पुढं म्युनिसिपालिटी, माळकर तिकटी (मोदीखाना) पुढे मराठा बँकेसमोर लोकल बोर्डाचं ऑफिस, लाटकर बिल्डिंगमध्ये मिरजकरांचं सर्वांत जुनं टायपिंग सेंटर, सांगावकर पेंटर, पुढे स्वामींची खानावळ. या खानावळीत पाटावर बसून पंक्तीत जेवायचं. प्रत्येक ताटाला फुलपात्र, तांब्या, ताटाला तुपाची वाटी, तूप सोडून इतर सगळं खाईल तेवढं. माजी उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती विद्यार्थी दशेत असताना याच


खानावळीचे 'मासिक मेंबर'.


आता जेथे नगर भूमापन (सिटी सर्व्हे) कार्यालय आहे ती ट्रेझरी. त्यासमोरच डॉ. गुण्यांचा दवाखाना. होमिओपॅथीचा दबदबा त्याच्या उपचारातून निर्माण झालेला. त्या शेजारी चौधरी वाडा, अकबर मोहल्ला, रत्नागिरी गेस्ट हाऊस, पन्हाळकरांचं रिझ हॉटेल, सुर्वेवाडा, गाडगीळांचा वाडा. पुढारी ऑफिस, गाडगीळ वाड्याजवळ गंगाराम कांबळेचं हॉटेल. समाजसुधारणेच्या इतिहासात ज्या हॉटेलचा मोठा वाटा तेच हे हॉटेल.या हॉटेलात चहा पिण्यासाठी शाहू महाराज मुद्दाम थांबायचे. पुढे मामलेदार कचेरीजवळ दगडी कमान, दुसऱ्या महापुरात बळी पडलेल्या सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेला स्तंभ. ही कमान अलीकडे उतरविण्यात आली व ती केशवराव भोसले नाट्यगृहासमोर उभी करण्यात आली. या रस्त्यावर पुढे टाऊन हॉल, न्यायालय, थोरला दवाखाना (सी.पी.आर.), पॉवर हाऊस (पंचाय


समिती कार्यालय), आता चिमासाहेब महाराजांचा पुतळा आहे तेथे राणी व्हिक्टोरियाचा पुतळा. पुढे घोड्याची


बाग (प्रिन्स शिवाजी उद्यान) बावड्याचा पूल (प्रिन्स शिवाजी पूल), सरदार गायकवाडांचा वाडा, इचलकरंजीकर घोरपड्यांचा वाडा (आताचे महावीर कॉलेज), त्यासमोर विशाळगडकर कंपाऊंड व नवीन राजवाड्याला जाऊन मिळणारा रस्त्याचा एक फाटा.


या रस्त्याने दसऱ्याचा छबिना (दसरा मिरवणूक) निघाला. सोन्याची अंबारी असलेला हत्ती या निमित्ताने जनतेने पाहिला. आज शानदार छबिना नाही; पण या रस्त्याचा जुना थाट कायम आहे.

1 comment: