मंगळवार पेठेच्या परिसराचं मूळ नाव जिजापूर. पद्माळा तलावाच्या काठावर वसलेला हा परिसर जुन्या कोल्हापूरचा हा एक महत्त्वाचा भाग, पण तत्कालीन परिस्थितीत हा भाग गायकवाड घराण्याला इनाम दिलेला, त्यामुळे या पेठेतील कराची वसुली करण्याचा अधिकार गायकवाडांकडे, अशाच प्रकारे शनिवार पेठ सयाजीराव जाधवांना इनाम दिलेली. गुरुवार पेठ रावजी महाराजांना, केसापूर पेठ शंकराचार्याना व जुना बुधवार पेठ जखगिरी गोसाव्यांना इनाम दिलेली.
मंगळवारात आता दावल मलिकची तुरबत (माणगावे मास्तरांचं घर) जेथे आहे, तो मंगळवारातला तत्कालीन कर वसुली नाका. माणगावे मास्तरांचं घर म्हणजेच या नाक्याची इमारत. या नाक्यावर जकात वसुली व्हायची गायकवाडांच्याकडून, या परिसरातील कराची वसुलीही त्यांच्याकडूनच. या वसुलीचा काही भाग ते संस्थानात जमा करायचे. करवीर राज्य संस्थापिका ताराराणी यांच्यासोबत यशवंतराव गायकवाड कोल्हापुरात आले व विश्वासराव या किताबाने हे घराणे पुढे गौरविले गेले १८७३ साली इनाम पेटा रद्द झाल्या व मंगळवार पेठ भाग म्युनिसिपालिटीच्या हद्दीत समाविष्ट झाला व पुढे तर कोल्हापूरच्या अंतरंगाचा प्रमुख घटक बनला.
मंगळवार पेठेची हद्द मिरजकर तिकटीपासून पुढे यल्लमा देवळापर्यंत पसरलेली. ज्यांचं नाव या तिकटीला तो मिरजकरांचा वाडा पेठेच्या तोंडालाच. हे मिरजकर म्हणजे हरी बापूजी मिरजकर. प्रसिद्ध सराफ आणि हंडी देण्या-घेण्याचा व्यवसाय करणारे. त्या काळात बँकांचे जाळे नव्हते. त्यामुळे बहुतेक व्यवहार हुंडीवरच अवलंबून. त्यात मिरजकरांचे व्यवहार म्हणजे त्यांची हुंडी देशात कोठेही डोळे झाकून वटणारी. मिरजकरांच्या वाड्यात मध्ये चौक, बाजूला ओसरी, त्यात काम करत बसलेले पन्नासहून अधिक सुवर्ण कारागीर. वाड्याच्या मागे मिरजकरांची बग्गी थांबलेली.
या तिकटीलाच एक पाण्याचा हौद. साधारण १८९७-९८ सालचा. कोल्हापूर शहराला कळंब्याहून पाटाने जे पाणी आणले ते शहरात ठिकठिकाणी हौद बांधून साठविण्यात आले. त्यावेळचा हा हौद. अजूनही खणखणीत. तिकटीला आता रिक्षाचा मोठा तळ; पण त्या वेळी टांग्यांचा वापर त्यामुळे तिकटीला टांग्यांचा अड्डा कित्येक वर्षे राहिला.
तिकटीपासून आत जो मुख्य रस्ता त्याचं नाव विवेकानंद रस्ता. भारत भ्रमणाच्या काळात स्वामी विवेकानंद कोल्हापुरात आले होते. या मुख्य रस्त्यावरून त्यांची मिरवणूक काढण्यात आल्याने रस्त्याला विवेकानंदांचं नाव दिलेलं.
कोल्हापूर शहराच्या स्थित्यंतरात मंगळवार पेठेचा सहभाग मोठा राहिला. १८५ च्या बंडात राधाकृष्णाच्या मंदिरात जो थरार घडला, ते मंदिर मंगळवार पेठेतच. बंडात सहभागी झालेल्या सैनिकांना या मंदिरातच ब्रिटिशांच्या गोळीचे बळी व्हावे लागले. कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारा पाण्याचा खजिना मंगळवारातच. १७८८ साली बाबूराव केशव ठाकूर या दानशूर गृहस्थाने पाण्याच्या खजिन्यासाठी जागा देणगी दिली. १८७७ साली या ठिकाणी खरजिन्याचे बांधकाम पूर्ण झाले. १५ ते १७ लाख लिटर पाणी त्यात साठते. शहराच्या वाढत्या विस्तारामुळे हे पाणी आता पुरेसे ठरत नसले तरीही या खजिन्यातून पाण्याचा एक थेंबही अजून गळत नाही.
मंगळवारातच आनंदीबाईंचा वाडा. आनंदीबाई म्हणजे शाहू महाराजांच्या जनक आई. त्यांच्या मांडीवरच शाहू महाराजांचा दत्तक विधान सोहळा झाला. या वाड्यात नंतर महिलाश्रम सुरू झाला. मंगळवारातच म्हादू गवंडी या पैलवान कार्यकर्त्याने ब्रिटिश फौजेतील सक्तीच्या लष्कर भरतीला उघड विरोध केला. भरतीच्या ठिकाणी गोंधळ माजवून भरती विस्कळित करून सोडली.
मंगळवारातच विठ्ठल व ओंकारेश्वराचे प्राचीन मंदिर, मिरजकर तिकटीचे हे मंदिर महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामाच्या वेळी बांधलेले. एखादी नाजूक रांगोळी घालावी तसे या मंदिराचे कोरलेले शिल्प आहे. याच मंदिराच्या आवारात १८५५ साली बांधलेली एक धर्मशाळा आहे. मदन गोपाळ शाळिग्राम (झंवर मारवाडी) यांनी ही धर्मशाळा बांधली. फक्त हिंदू प्रवाशांना तीन दिवसांसाठी राहता येईल, असा मजकूर या धर्मशाळेवरील मजकुरात आहे. आता या धर्मशाळेच्या ठिकाणी नूतन मराठी विद्यालय आहे.

No comments:
Post a Comment