Monday, May 25, 2020

छत्रपतींच्या पाऊलवाटा....!!!

                                 हिरव्या हिरव्या साडीचा आहेर घेऊन येणारा पाऊस काळ्या सह्याद्री ची ओटी जेंव्हा  जलधारांच्या वर्षावाने भरतो तेंव्हा त्याचे रोम रोम पावन होऊन परमार्थाला प्राप्त होते. सह्याद्री. श्री रामा पासून छत्रपतीं पर्यंत अनेक ऐतिहासिक घटनाचा प्रत्यक्ष साक्षीदार किल्ल्यांचा प्रत्येक दगड ,सह्याद्रीचा प्रत्येक दगड महाराजांची अमर गाथा अजून सांगतो पण फक्त ऐकायला कान पाहिजेत.  याच सहयाद्रीचा आवाज ऐकायला आम्ही ही निघालो पन्हाळा पावन खिंड पदभ्रमंती ला ...........

                छत्रपतींचा जयघोष करत पन्हाळा उतरताना खरच त्यांनी खाल्लेल्या खस्थांची आठवण होते आणि डोळ्यातून आपसूकच पाणी येते खाली बघताच पन्हाळ्याच्या भव्यतेची आणि सिद्धी च्या वेढ्या ची आठवण होते, कुट्ट अंधार खवळलेला वरून राजा आणि पालखी घेऊन खाली उतरणारी काही 



पाऊलं,पायाखाली पाचोळा चुरचुरत होता "पृथ्वी वर अवतरलेला परमात्मा हाच वाटत" लांब झाडावर बसलेलं घुबड मोठ्या डोळ्यांनी प्रत्येक क्षण टिपत होत,त्या रात्री अंधार ही जास्तच होता कदाचित महाराजांच्या रक्षणासाठी परमात्मा पण तत्पर होता. हे सगळं आठवलं की दमलेल्या पायात अचानक बळ येत आणि चालायला लागतात. किती महान होते ना ते लोक देशा साठी धर्मा साठी प्राण पण फुला सारखे उधळले .पण इतिहास मुक्का आहे तो काहीच सांगत नाही म्हणून निवडक सोडले तर इतक्या मौल्यवान रत्नांची नाव सुद्धा आपल्याला माहीत नाहीत. पण या सह्याद्रीला सगळं आठवत अगदी कालच घडल्या सारख पण त्याच ऐकायला कोणी येत नाही आजकाल .



                       पन्हाळा उतरून मसाई पठारावर जाताना उंच उंच दगड हळूच विचारतात "बाबांनो पायात बळ आणि मनात छ्त्रपती असतील तरच पुढं पाऊल टाका नाहीतर पठारची मसाई तुम्हाला वर घ्यायची नाही अनेक मुघलांचा कडेलोट केलाय तिनं"पठारावर गेल्यावर निसर्गाच्या सुंदरतेची जाणीव होते . तिथं मसाई च एक छोटंसं मंदिर ही आहे इथली ग्राम देवता म्हणून ही ती ओळखली जाते .  



                             पठारावरून उतरण्यासाठी पायवाट आहे, जाताना चॉकलेट ठेवा थोडे बरोबर आदिवासी वस्तीची मुले ही भेटतात वाटेत त्यांना दिले तर त्यांच्या चेहऱ्यावर चा आनंद पाहण्यासारखा असतो खाली उतरुन काही तरी खाऊन पुढच्या प्रवासाला निघालेलं बरं कारण पुढचा प्रवास जरा अवघड आहे.



  उचं निर्गीली वन आता चालू होत मोठं मोठी निर्गीली त्यांचा येणारा तो मादक वास पाहता पाहता आता सूर्य उतरतीला लागला असतो.धुक्याची चादर पांघरून हे वन सुद्धा झोपायची तयारी करत त्याच्या आधीच तिथून बाहेर पडलेले बरं नाही तर तिथेच हरवाल.

 वणानंतर येती ती छोटीशी वस्ती आंबेवाडी 400 500 माणसंच छोटस गाव जास्त करून इथले तरून शहराकडे गेले ते परतलेच नाहीत, त्यांचीच वाट बघत शेवटचे दिवस मोजणारे काही चेहरे मी पाहिले या गावात. जंगलात  हरवलेला सापडेल पण शहरात हरवलेला सापडणं अवघड असत. पण काही ही म्हणा एवढं चालून जे दोन भाजी भाकरीचे घास जे पोटात जातात ना त्या पुढे मग पंच पक्वान्न पण फिक वाटत ,आणि झोप ती तर स्वर्ग सुख च असते दुसऱ्या दिवशी लवकर उठून चालायला लागायचं कारण अजून खूप डोंगर आपली वाट पाहत असतात पुढे. दुपार पर्यंत चालून शेवटी पोहोचतो आपण पावनखिंडीत  ......
    

                             पावन खिंड बाजीप्रभुंच्या शौर्याने पावन झालेली जागा. तिथं गेलं ना प्रत्येक दगडाला मिठी मारावीशी वाटते सांगावस  वाटत की स्वराज्यासाठी सांडलेल्या त्या रक्ताने तुला अमर केलं रे काही गोष्टी अश्या असतात ज्या शब्दात  कधीच व्यक्त होत नाहीत तसच आहे हे नातं पण.नुसतं बघितलं तर दगडं आहेत पण जरा थांबा शांत व्हा मग बघा वेदनेला विरता बनवण्याचा मूलमंत्र शिकवतील ते फक्त समजायला तुम्ही सुजाण हवेत.

Monday, May 18, 2020

एक आठवण पुराची....!

                        फक्त लढ म्हणा कविता खूप वेळा  ऐकली होती . सुरेख काव्य लेखन सुंदर वाक्य रचना .पण वाटलं न्हवत की ती कधी प्रत्यक्षात पण अनुभवायला मिळेल.

                                              आषाढ आता उतरतीला लागला होता तुकारामांच्या पालखीचा गोंडा आता परतीला लागला होता . आता आतुरता होती ती श्रावणाची ,ऊन सावलीच्या श्रावणाची कोणी नवविवाहिता ला आतुरता होती ती तिच्या माहेरपणाची,मंडपात बसणाऱ्या गणपतीची, किती सुंदर असतो ना श्रावण ! हिरवा शालू नसणाऱ्या धरतीला सोनेरी काठ लावणारा श्रावण .....


                               पण ऊन सावलीच्या श्रावणाची सावली इतकी गडद असेल असे कदाचीतच कोणाला वाटले असेल श्रावण महिन्यातला तो पहिला शुक्रवार होता साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापुरात तो मोठ्या आनंदानं साजरा होत होता; भरजरी वस्त्र आणि मोठं मोठे अलंकार घालून जगदंबा सजली होती. धुपदीप आरत्या चालल्या होत्या. पण का कुणास ठाऊक जगदंबेच्या चेहऱ्यावर एक आकस्मित शांतता पसरली होती कोना थोर भक्तालाच ती उमगली असावी. शुद्ध अंतकरणाने दगड जरी पुजला तरी त्यात परमात्मा आवतरतो असे म्हणतात बाकी काय सर्व मिथ्या आहे.किती वेळ झाला पण आज सूर्य दर्शन झालेच न्हवते पावसाची संततधार सुरूच होती असेल कदाचित प्रत्येक जण आप आपल्या कामात मग्न होता.शुक्रवार गेला शनिवार गेला रविवार गेला पण पाऊस काय कमी येत न्हवता. आता मात्र वाढणारा पाऊस चिंतेच कारण बनत चालला होता. नागपंचमीची ती रात्र होती नागासारखी वळण घेणारी पंचगंगा आता अजगरासारखी कोल्हापूरला गिळत चालली होती कोल्हापूरला मात्र याचा आभास ही न्हवता ते शांत निजले होते.


            दुसरा दिवस उजाडला पाहतो तो काय पंचगंगा आता उंबरठ्यावर येऊन टेकली होती.काळीज धस्स करणारी जाणीव आता मनात होऊ लागली. इकडं पुलावर मात्र लोकांची पूर पाहण्यासाठी गर्दी होत होती पाण्याचा खळखळनारा आवाज दुरून वाहून येणारी मोठं मोठी झाडं पाण्याची ताकत स्पष्ट करत होतीत.राधानगरी धरणाचे दरवाजे आता हळूहळू उघडू लागले होते शत्रूच्या भात्यातून  सुटलेला बाण जसा छातीवर येऊन धडकावा तसा पाण्याचा प्रत्येक लोंढा कोल्हापूर वर येऊन धडकत होता.



                   हुंबर्यावरच पाणी आता आत आलं होतं, घोटा गुढगा करत आता कंबरेपर्यंत चढलं होत . पुराचा महापूर झाला होता हे प्रत्येकाला कळून चुकलं होतमाणसांनी दुसऱ्या मजल्यावर,पत्र्यावर आश्रय घायला सुरवात केली होती मातीची घरे आता ढळू लागली होती,पण पडणारी नुसती घरे न्हवती भावना होत्या आयुष्य होत संसार होते लोकांचे . उंच उंच वाडे पत्त्याच्या महालासारखे पडत होते कधी पाहिलेला दिवस आज कोल्हापूरसाठी उजाडला होता.ही तपोभूमी होती उत्तर काशी नंतर दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे कोल्हापूर आता स्वतःच्या मुक्तीची प्रार्थना करत होते. बघता बघता महापुराचा विळखा घट्ट बसला होता,हजारो एक्कर शेती पाण्याखाली गेली होती कोल्हापूरात प्रवेश करण्याचे एकमेव द्वार महापुरामुळे बंद झाले होते . वर पाहावे तर आकाश दिसत नाही खाली पाहावे तर जमीन दिसत नाही अश्या दयनीय अवस्थेतून जात होता प्रत्येक जण. जन्माला येऊन एकतरी कोल्हापूरी माणूस जोडावा म्हणतात मदतीची वक्त बघता प्रत्येक जण एकमेकांच्या मदतीला धावत होता. महादेवाच्या मदतीला महोम्मद धावला ,मेरीच बाळ आज मिराच्या कुशीत खेळत होत खरच आज जातीत हरवलेला माणूस सापडला होता .वाट अडचणींची होती पण अडचणींना पण सांगा की वारसा संघर्षाचा होता .


                                    प्रत्येक स्तरातून मदत येऊ लागली होती. कपडे ,धान्य,डाळी  यांच्या राशी उभा राहू लागल्या पण पूरग्रस्तांना खरी गरज होती ती आधाराची मायेची  आयुष्य खर्ची पडत माणसाला संसार उभा करायला आणि तो जेंव्हा तुटतो तेंव्हा येणाऱ्या संकटाची कल्पना तुम्ही करू पण शकत नाही. धीर देणार्याला पण कोल्हापूर कोल्हापूरकर कुठं माग पडत नाहीत. प्रत्येक जण उद्याची आस लावत होता आता खळखळनाऱ्या पाण्याचा आवाज आता प्रत्येकाच्या मनातील जोश ताकत अजून वाढवत होता.आता मात्र परमेश्वराला सुद्धा हात टेकायला लागले पाच सहा दिवसानंतर सूर्याचा एक किरण आत प्रवेशला. तो एक आशा घेऊन आला आशा त्या प्रत्येक बाळाच्या चेहऱ्यावर विखुरण्यासाठी आला ज्याचं नवं नवं जग आज उध्वस्त झालं होतं.आशा त्या प्रत्येक तरुणांच्या हृदयात भरण्यासाठी आला त्याच तारुण्य कदाचित माहापुरात वाहून गेल होत. हे सारं बघून प्रत्येकाच्या डोळ्यातून निघणारे आश्रू कित्येक दिवस चाललेल्या जीवन मरणाच्या संघर्षाच प्रमाण देत होते. प्रत्येकानं केलेल्या संघर्षाची गाथा आता सूर्यनारायण आपल्या तेजोनिशी गाऊ लागला.पूर आता ओसरत होता पण संघर्ष अजून संपला न्हवता आयुष्याची सुरवात आता नव्यानं करायची होती शून्यातून विश्व उभं करायचं होतं. काही झालंच नाही असं समजून प्रत्येक जण आता कामाला लागला महापूर सर्व काही घेऊन गेला घर दार ,गाई गुरे माणुसकी मात्र मागे ठेवली प्रत्येक धर्माने आपला रंग निवडला पण रंगाचा मात्र कोणता धर्म नसतो. प्रत्येक धर्म प्रेम आणि माणुसकीच शिकवतो. आणि माणुसकी पेक्षा मोठा कोणताच धर्म नसतो आज महापुराने शिकवलं...... !



Friday, May 8, 2020

फुटबॉल वेडे कोल्हापूरकर भाग 2


                            तो 1900 चा काळ होता , कोल्हापुरातील खूप युवा संख्या ही  दारू सिगारेट सारख्या व्यसनाच्या आधीन झाली होती.बेरोजगरीमुळे अनेक कुटुंबे देशोधडीला लागली होती ,राजाराम महाराजांना या वर उपाय शोधायचा होता, आणि तो उपाय घेऊन आले ते प्रिन्स शिवाजी. प्रिन्स शिवाजी हे विदेशात उच्च शिक्षण घेत होते, त्यांनी तिथे फुटबॉल हा खेळ  बघितला होता आणि हा खेळ तसा रांगडा आपल्या कोल्हापूरकरांसारखा आणि हा खेळ मायदेशी नेण्याची त्यांची इच्छा होती.1914 साली प्रिन्स शिवाजी आपलं शिक्षण पूर्ण करून भारतात आले .त्या काळात नारायण सिंघ कोल्हापुरात फुटबॉल खेळायचे,त्यांच्या मदतीने प्रिन्स शिवाजींनी फुटबॉल खेळायला सुरुवात केली,आणि इ.स. 1916-17 च्या दरम्यान कोल्हापुरात फुटबॉल खऱ्या अर्थाने सुरू झाला.                                             
                 1918 साली  प्रिन्स शिवाजींचे अपघाती निधन झाले.त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापुरातील फुटबॉल चा स्थर उंचावण्याची जवाबदारी घेतली.त्यांनी नवीन संघाची स्थापना केली ज्याला 'भवानी पॅलेस संघ' असे नाव देण्यात आले. कालांतरने ते बदलून संघाचं नाव ' जय भवानी ' केले गेले,कुलदेवी भवानी असल्यामुळे ठेवण्यात आले,जे संघ राजाराम महाराजांच्या मालकीचे होते त्या सर्व संघांचे नाव हे जय भवानी ठेवण्यात यायचे.
 
                  आता फुटबॉल हळूहळू कोल्हापूरात रुजू लागला होता, वेगवेगळे संघ तयार होऊ लागले होते.देवास चे युवराज विक्रम पवार जेव्हा कोल्हापुरात शिक्षणासाठी आले होते,राजाराम कॉलेज मध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी ' देवास युवराज क्लब ' हा संघ काढला,त्याच बरोबर  राजाराम महाविद्यालयांचा अधिकृत संघ होय ज्याला ' राजाराम11 '  म्हणून ही ओळखलं जातं होत. आता हळूहळू फुटबॉल कोल्हापुरातल्या पेठांमधून पसरू लागला होता . त्या काळी बॉल ची निर्मिती तशी कमीच असायची,त्यामुळे लगद्याचे गोळे आणि रबर वापरून तयार केलेले बॉल फुटबॉलची कमतरता भरून काढत होते. स्टेडियम उपलब्ध नसल्याने मोकळ्या रानात, माळावर हा खेळ खेळू जाऊ लागला.

श्री.शिवाजी तरुण मंडळ वि. महाकाली भजनी मंडळ सामन्यातील एक क्षण

  
                    वविश्वायुद्ध 1 चे सेवानिवृत्त अधिकारी गणपतराव भोसले , श्रीपतराव साळोखे उर्फ तात्या जामदार यांनी राजाराम माध्यमिक शाळेचे शिक्षक मालकासिंग यांना घेऊन झुंजार क्लब ची स्थापना केली. ज्याची प्रॅक्टिस ही पंचगंगा घाटावर असणाऱ्या शंकराचार्य मठाच्या प्रांगणात होत असे. 1922 साली त्यांनी राजाराम माध्यमिक शाळेच्या मुलांच्या संघाची स्थापना केली त्या टीम च नेतृत्व बाबलाल बागवान यांनी केलं आणि त्या टीम च नाव प्रॅक्टिस क्लब ठेवण्यात आलं अश्या प्रकारे झुंजार क्लब आणि प्रॅक्टिस क्लब असे दोन संघ उदयास आले.

 


           त्यानंतर शिवाजी तरुण मंडळ 1932 ला , बालगोपाल तालीम मंडळ 1946 ला ,दिलबहार तालीम मंडळ 1955 ला , पाटाकडील तालीम मंडळ, 1960 ला ,शाहूपुरी 1966 ला ,खंडोबा तालीम मंडळ 1991 ला , संध्यामठ 1990 ला तर अनिल मंडलिक स्पोर्टइंग 1994 ला उदयास आले. त्यापाठोपाठ बळीराम तालीम,मेनॉन, KMC, बागल चौक तरुण मंडळ, गडहिंग्लज फुटबॉल संघ, दक्षिण सातारा पोलीस( सांगली पोलीस),पोलंड संघ(गडहिंग्लज पोलीस), मिरज वैद्यकीय महाविद्यालय, आरवाडे बंधू (सांगली), गांधी चौक मिरज असे संघ तयार झाले. राजाराम महाराजांच्या निधनानंतर देवास चे युवराज हे विक्रम पवार हे छ.शाहजी म्हणून छत्रपती झाले आणि त्यांनी 8 एप्रिल 1940  साली कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (KSA) ची स्थापना केली.छत्रपती शहाजी महाराजांनी 1947 - 1983 अशी सलग 36 वर्ष KSA च पेट्रन पद सांभाळ. त्या काळात शाहजी राजांनी छ.शाहू स्टेडियम आणि पोलो ग्राउंड अशी मैदान संघांना मिळवून दिली.या स्टेडियम मुळे कोल्हापूरची दारं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेनसाठी खुली झाली होती. ONGC (Oil And Natural Gas Corporation) ही राज्यस्तरीय स्पर्धा कोल्हापुरात भरवली गेली. भारत विरुद्ध हॉलंड ही मैत्रीपूर्ण महिला फुटबॉल सामना हा कोल्हापूरकरांनी अनुभवला.
श्री.शिवाजी तरुण मंडळ संघ
       
        जसजसे दिवस बदलू लागले तसतसे खेळाडू आणि संघ दोन्ही वाढू लागले .कोल्हापूरचे छत्रपती, जत किंग, सांगलीकर पटवर्धन, या काही राजवंशीय संघांनी फुटबॉल कोल्हापूरच्या छोट्या छोट्या गावात पसरवला.
 
                  कोल्हापूरात शालेय वया पासून फुटबॉल ची आवड निर्माण करायला आणि खेळाडू निर्माण करायला शालेय संघ जसे सिटी क्लब,जॉली क्लब, फ्रँडझ क्लब,न्यू हायस्कूल ,मराठा बोर्डिंग, शिवाजी क्लब,बालविर,लायन,टायगर,ईगल क्लब यांनी मोलाचे सहकार्य केले .
                     जसे संघ मोठे होते तश्या स्पर्धा आणि चषक ही मोठे होते त्यातले काही चासकांमध्ये मग येतात दाभोळकर चषक (कनिष्ठ गट) ,केळवकर चषक (वरिष्ठ गट) , छ्त्रपती शाहू सुवर्ण चषक ,1960 पासून सुरू झालेले दसरा चषक,अन्वर चषक, दामू अण्णा मालवणकर चषक कोल्हापुरात खेळवले गेले, काही दिवसांनी दाभोळकर चषक आणि केळवकर चषक हे KSA 'A' आणि 'B' असे भाग पाडण्यात आले .रोमांचक आणि आकर्षक अशे पुढारी चषक (PFL), महासंग्राम चषक, मुस्लिम बोर्डिंग चषक , अस्मिता चषक ,नेताजी चषक, तर शालेय संघांसाठी KUFA चषक हे खेळले जायचे. तर ' वेटरण 'चषक हे  वृद्ध आणि निवृत्त खेळाडूंसाठी खेळवले जायचे. 1985 साली दिलबहार तालीम मंडळाने प्रथमच रात्रीच्या फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या ज्यांना आपण आताच्या भाषेत Night Matches असे म्हणतो. आणि त्याला छत्रपती राजश्री शाहू चषक नाव देण्यात आले.
                   आज कोल्हापूर फुटबॉल विश्वाचा विस्तार हा प्रचंड झाला आहे, आणि त्यांचे विभाजन A,B,C,D,E अश्या तुकड्यात करण्यात आले आहे .  आणि ग्रामीण विभागाचे विभाजन त्यांच्या खेल कौशल्यावर केले गेले आहे.

Friday, May 1, 2020

फुटबॉल वेड कोल्हापूर भाग 1

              भारत हा असा देश आहे जो क्रिकेट ला एक धर्म मानतो आणि  क्रिकेटपटू धर्मरक्षक . पण क्रिकेट वेड्या भारतात फुटबॉल वेडे आहे ते महाराष्ट्राचे कोल्हापूर. जिथे फुटबॉलपटू ला देव मानलं जातं. आणि याचाच कळस म्हणजे फुटबॉलपट्टू चे वाढदिवस इथे अनाथांनबरोबर आणि रक्त दान शिबिर आयोजित करून साजरे केले जातात,फुटबॉल वेड्या कोल्हापूर चे संघ हे 50 ते 55 वर्ष जुने आहेत . छत्रपती राजाराम महाराजानीं 1940 साली सुरू केलेली परंपरा अजून ही तेथे जोपासली जाते, ज्या परंपरेने कोल्हापूरचे नाव भारताच्या इतिहासात कोरले आहे .
छ.राजाराम महाराज,करवीर सौंस्थान


             कोल्हापूरच्या खूप खेळाडूंनी त्यांच कौशल अनेक स्तरांवर दाखवलं आहे. पण काही आर्थिक अडचणींमुळे काही जण अजून खस्ता खात आहेत त्यांचं आयुष्य उज्वल करण्यासाठी .
पाटाकडील तालीम मंडळ संघ (साल:2002)

छ.शिवाजी तरुण मंडळ संघ (साल:2000)

दिलबहार तालीम मंडळ संघ (साल:2000)

KSA (कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन)  हे छत्रपती राजाराम महाराजांनी स्थापन केलेली संस्था आहे , ज्या अंतर्गत कोल्हापूर फुटबॉल संघांचा चषक खेळवला जातो ज्याला कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा चषक मानला जातो .
त्या खालोखाल

१. अस्मिता चषक
२. नेताजी चषक
३.सतेज चषक
४. राजेश चषक
५.महासंग्राम चषक
६. मुस्लिम बोर्डिंग चषक
७.राजेश्री शाहू महाराज चषक
८. कुफा( अंतर शालेय स्पर्धा)
                   आयोजित केल्या जातात. जिंकणाऱ्या संघासाठी मोठं बक्षीस आणि इतर उत्तेजनार्थ बक्षीसे ही दिली जातात.अटीतटीचे सामने, समनीय इर्षा यांनी मैदान भरून जात. तिथे महिलांसाठी ही वेगळे सामने खेळवले जातात. भारतीय महिला फुटबॉल संघात सुद्धा कोल्हापूर च्या महिलांचा लक्षणीय सहभाग आहे.
नुकताच FC कोल्हापूर फुटबॉल क्लबने ISL मध्ये सहभाग घेतला होता.
कोल्हापुर फुटबॉल चा होणारा हा विकास बघता तो दिवस दूर नाही जेंव्हा कोल्हापूर फुटबॉल  च्या बाबतीत  भारतात अग्रस्थानी असेल.