त्यांचे नाव गणपतराव भोसले, पण त्या नावाने त्यांची ओळख कमी. मूळ नावापेक्षा सांकेतिक नावाने ओळखण्याची पद्धत कोल्हापुरात पिढ्यानपिढ्या चालत आलेली. परिसरातल्या उंच भागात राहणाऱ्या शंकरची ओळख चढतीवरचा शंकर', उतारावर राहणाऱ्या यशवंतरावाची ओळख 'डबऱ्यातला येसबा', तशी गणपतरावांची ओळख 'लढाईवाला गणपतराव', पहिल्या महायुद्धानंतर लष्करातून निवृत्त झालेल्या गणपतराव भोसलेंनी कोल्हापुरातल्या पहिल्या फुटबॉल संघाला आकार दिला. श्रीपतराव साळोखे ऊर्फ तात्या जामदारांनी १९१० मध्ये फुटबॉल संघ स्थापन केला. या फुटबॉल संघाची जागा पंचगंगा नदीकाठावर चक्क शंकराचार्यांच्या मठात. मठात मंत्रपठणाचे सूर घुमायचे आणि बाहेर फुटबॉलचा सराव चालायचा. तात्या जामदारांच्या या फुटबॉल संघाला गणपतराव भोसल्यांनी शिस्त आणली व 'जामदार क्लब' या नावाने कोल्हापुरातल्या पहिल्या फुटबॉल संघाची नोंद झाली.
जी. एच. हरेर, गोविंदराव काटे, के. टी. देसाई, दिनकर सुर्वे, शंकर सावंत, दत्ताराम देशपांडे, जी. एस. पाटील, वसंत पोवार, डी. पी. चव्हाण, व्ही. व्ही. पोवार माघवराव पोवार, तुकाराम शिंदे, सजाराम भुसारी, ग्रॅबियल रजपूत यांनी या संघाला बळ दिले व जामदार क्लबचे नाव १९१० ते २० या काळात प्रत्येकाच्या तोंडी झाले.
छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीपर्यंत हा संघ शंकराचार्यांच्या मठातील जागेत होता. महाराजांच्या मृत्यूनंतर मठाच्या जागेतून संघाला अन्यत्र जाण्याची वेळ आली. या परिस्थितीत तात्या जामदारांनी आपली स्वत:ची जागा फुटबॉल क्लबला दिली. शंकराचार्यांचा मठ ज्या गल्लीत आहे त्या गल्लीच्या तोंडावरच जामदार क्लबची इमारत आहे. आता या क्लबमध्ये फुटबॉल खेळला जात नाही. पत्त्याचा बैठा खेळ चालतो. क्लबच्या वतीने मंगल कार्यालय चालवले जाते. अल्पदरात मध्यमवर्गीयाला परवडेल असे हे कार्यालय आहे. पंचगंगेच्या महापुरात प्रत्येकवेळी पुराचे पाणी जामदार क्लबच्या इमारतीत येते. क्लबचा पहिला मजला अर्धाअधिक पाण्यात असतो. या क्लबने कोल्हापूरच्या फुटबॉलला जन्म दिला; पण या क्लबपुरता तरी फुटबॉल आता संपला आहे.
राजाराम हायस्कूलचे प्राचार्य मलकासिंग यांची फुटबॉलची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती; पण फुटबॉलचा संघ तयार करावा, अशी परिस्थितीही नव्हती. त्या परिस्थितीत मलकासिंग यांनी संघ स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. १९२२ च्या दरम्यान त्यांनी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा एक संघ तयार केला आणि एका वर्षी बाबालाल बागवान स्मृती फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस क्लब या नावाने सहभाग घेतला, द्वारकानाथ पारसनीस (मेजर), श्रीराम कुरणे, दत्ताजीराव मोहिते (बाँड रायटर), शंकरराव मांगलेकर (तेली मास्तर), नारायण माळी, मारुती माने, रघू कुरणे, दगडू पाडळकर, गणपत भोईटे, श्रीपती इंदुलकर, सखाराम घाटगे, शामराव बावडेकर या संघातून खेळले. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार विजय हजारेही याच संघातून फुटबॉल खेळले. हाच संघ पुढे प्रक्टिस क्लब' या नावाने नावारूपास आला. पांडुरंग परशुराम मोहिते ऊर्फ दुकानदार यांनी संघाची नंतर जडणघडण केली. संघातील खेळाडूंच्या ड्रेसवे गठळे बांधून मैदानावर जाण्यापासून ते सामन्याच्या मध्यंतरात खेळाडूंना सोडा-लिंबू देण्यापर्यंत काळजी त्यांनी घेतली. मंगळवार पेठेतला हा क्लब आज फुटबॉलमधल्या नामांकित संघातला एक संघ ठरला आहे.
१९२० ते ४० हा काळ कोल्हापूरच्या फुटबॉलला अधिक उभारी देऊन गेला. छत्रपती राजाराम महाराजांना फुटबॉलची खूप आवड. त्यामुळे फुटबॉलला राजाश्रय मिळाल्यासारखेच वातावरण, १९२२ च्या दरम्यान कोल्हापुरात १५ वर्षाखालील मुलांसाठी फुटबॉलचे सामने व्हायचे. उदयोन्मुख खेळाडूंचा शोध त्या स्पर्धेतून लागायचा व चांगल्या खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी स्थानिक संघांत चढाओढ लागायची.
त्या काळात राजाराम कॉलेजच्या मैदानावर (सध्याचे शिवाजी स्टेडियम) फुटबॉलचे सामने व्हायचे. सध्याचे शाहू स्टेडियम म्हणजे रावणेश्वर तलाव होता. आता स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळ असलेले रावणेश्वराचे मंदिर तलावात मध्यभागी होते व तेथे जाण्यासाठी तलावातच खडीची भर घालून छोटा रस्ता होता. तलावाला रविवार पेठेच्या (दिलबहार तालीम) बाजूला पायऱ्या होत्या. आता आझाद चौकातून दिलबहार तालमीकडे येणारा रस्ता पुढे तलावामुळे बंदच होता. त्यामुळे राजाराम कॉलेजचे मैदान म्हणजे जणू फुटबॉलसाठी राखीव मैदानच होते. आजूबाजूला बसायला जागा नाही, तरीही तग धरून उभे राहून फुटबॉलशौकीन खेळाचा आनंद घेत. त्यावेळी सिटी हायस्कूल, राजाराम कॉलेज, सर्जेराव क्लब, जॉली क्लब, इन्फट्री क्लब, घोसरवाडकर क्लब, फर्नाडिस क्लब, बाराईमाम क्लब, न्यू हायस्कूल, मराठी बोर्डिंग, शिवाजी क्लब, बालवीर क्लब, लायन, टायगर व ईगल हे नावाजलेले संघ होते. छत्रपती राजाराम महाराजांची पॅलेस टीम व देवासचे युवराज विक्रमसिंग महाराज यांचा एक संघ होता. त्यामुळे सामने इने होत, याच काळात हिंदुराव पांडुरंग साळोखे या खेळाडूने आपला दबदबा निर्माण केला. बालवीर संघाचा हा खेळाडू न्यू हायस्कूल, बालवीर क्लब व नंतर छत्रपती संघाचा आधारस्तंभ ठरला. बालवीर क्लबचे कर्णधार हिंदुराव, तर शिवाजी क्लबचे कर्णधार विक्रमसिंह महाराज होते. कोल्हापुरातल्या या गाजलेल्या सामन्यात बालवीर क्लबने तीन विरुद्ध दोन गोलनी विजय मिळवला. सलग तीन गोल नोंदवणारे हिंदुराव सामनावीर ठरले. आज ते ९५ वर्षांचे आहेत. अजूनही फुटबॉलचे ते दिवस, ते क्षण त्यांच्या तोंडून ऐकायला मिळतात. स्मृती अजूनही इतकी ताजी की, एखाद्या सामन्याचे वर्णन ते डोळ्यांसमोर आजही उभे करतात. संस्थानकाळीतील या खेळाडूला नुकतेच कोल्हापूर भूषण देऊन गौरवण्यात आले.
कर्नाटकचे माजी मंत्री व्ही एल. पाटील-ब्याकूडकर बाराईमाम फुटबॉल क्लबचे खेळाडू होते. रविवार गेटाच्या आतला परिसर म्हणजे बाराईमामचा परिसर, १९३७ च्या सुमारास या परिसरात गोपाळराव उपळेकर यांच्या पुढाकाराने फुटबॉलचा संघ स्थापन झाला. त्यावेळी व्ही. एल पाटील-व्याकूडकर याच परिसरात खोली घेऊन शिकण्यासाठी राहात होते. उपळेकर, निजाम मोमीन, दगडू मास्तर, शामराव काळे, हाशूबाळ, जामदार, शंकर साळोखे, उषा पैलवान, फिलिप्स, रामन दिनकर यादव, दिनकर मगदूम, दत्ता विचारे, बंडा भोसले, पांडू कदम, कुंडले मास्तर, गौस मोमीन, आब्बास काझी, हारुण फरास या खेळाडूंनी हा
संघ गाजवला. संस्थान काळात भरवल्या जाणाऱ्या सामन्यांत या संघाला महत्त्वाचे स्थान मिळाले.
फाडफाड इंग्लिश बोलणाऱ्या ब्रिटिश सैनिकांचा स्वातंत्र्यपूर्व काळात मोठा दबदबा. त्यांच्या प्रथमदर्शनी व्यक्तिमत्त्वानेच बहुतके जण दबणारे. या सैनिकांची एक पलटण १९३६ च्या सुमारास पुण्याहून बंगळूरला जात होती. ताराबाई पार्कात (तत्कालीन रेसिडेन्सी परिसर) त्यांचा तळ होता. स्टडचे बुट, युनिफॉर्ममध्ये ते फुटबॉल खेळायचे, ताराबाई पार्कात त्यावेळी बैलगोठा नावाचे मैदान होते. त्या मैदानात ते सराव करायचे. त्यांच्याशी खेळायची इथल्या रांगड्या खेळाडूंची खूप इच्छा. प्रॅक्टिस क्लबच्या तत्कालीन प्रमुखांनी धाडस करून त्यांच्याबरोबर प्रदर्शनीय सामना ठरवला. गोऱ्या लोकांबरोबरच्या या सामन्याची मोठी हवा झाली. प्रॅक्टिस क्लबच्या खेळाडूंनी या संघाला बघता बघता दमवले. हा सामना एक-एक बरोबरीत संपला. या सामन्याने स्थानिक खेळाडूंना बळ आले व आपण परदेशी खेळाडूंशीही खेळू शकतो, याचा आत्मविश्वास आला. संस्थानकाळात कोल्हापूरच्या सामाजिक, शैक्षणिक व कृषी क्षेत्राचा जसा विकास झाला तसा विकास फुटबॉलच्या जगताचा झाला. त्या काळात फुटबॉल रुजला म्हणूनच आज यशाच्या वेशीवर फुललेला दिसू लागला.