विचारवंतांनी माणसाच्या आयुष्यात एक खेळ असे म्हंटले आहे. कुणा कवीने लिहिले आहे, दोन घडीचा डाव..... याला जीवन ऐसे नाव. या अर्थाने प्रत्येक माणूस हा खेळाडू असतो. अथवा नियती त्याला खेळवीत असते. माणूस स्वतःहून खेळतो तो स्वानंदासाठी व इतरांच्या आनंदासाठी.
या जगात खेळाचे म्हणून एक बलाढ्य विश्व आहे. या क्रीडा विश्वाने मानवी मनाला आपल्या व्यथा विसरायला लावले आहे. खेळणारा व्यथा-वेदना सहन करतो तरी तो प्रेक्षकाला आनंद देतच राहतो. प्रत्येक प्रदेशाला काही संदर्भ असतात. कोल्हापूर शहरही याला अपवाद नाही. स्थळ, काळ, भौगोलिक संमृद्धी, चांगले हवामान त्यामुळे इथे कला, क्रीडा चांगल्याच विकसित झाल्या. विषेशतः कोल्हापुरी कुस्ती,कोल्हापुरी चप्पल,कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा,म्हैशीच्या कट्टयावर मिळणारे धारोष्ण ताजे दूध आणि कोल्हापूरचा रसिक चोखंदळ फुटबॉल प्रेक्षक ही करवीरची खासियत.
कोल्हापुरी माणूस खाण्या पिण्यात वरचढ. संमृद्धीचे ढेकर देणारा, आनंदी,उधार मनोवृत्ती,परोपकारी,"भलेतरी देऊ कासेची लंगोटी,नाठाळाचे माथी हानू काठी ",अशा बाण्याचा.
इंग्रजी राजवटीचे परिणाम म्हणून अनेक विदेशी खेळ हिंधुस्थानात आले. त्यापैकी कोल्हापूरच्या रांगड्या आणि दणकट माणसाने कुस्ती नंतर आपलासा केला तो फुटबॉल खेळ. कै. श्रीमंत छत्रपती राजर्षी शाहू महाराज ते विद्यमान छत्रपती शाहूराजे यांनी या खेळास कुस्ती बरोबर फुटबॉल या खेळास प्रेरणा,संजीवनी दिली. याच बरोबर लोकाश्रयाचा वाटाही फारच मोलाचा आहे. आज कोल्हापूर शहर आणि गडहिंग्लज या दोनच ठिकाणी प्रेक्षकांनी फुटबॉल खेळ जिवंत ठेवला आहे. इथल्या प्रसिद्ध जामदार क्लब ने सन 1910 साली प्रथमच फुटबॉल संघांची मुहूर्तमेढ रोवली. पण खऱ्या अर्थाने पुढे सन 1927 पासून काही फुटबॉल संघ सामने खेळू लागले. या सशक्त खेळाने कोल्हापूरकरांना आसक्त करून कायमचेच आपल्या मोहजलाल गुंतविले. या काळी खेळात कोणतीच नियमावली प्रगत व काटेकोर नव्हती. सामन्यावर प्रेक्षक बेहद्द खुश मात्र संघसंघात चुरस,खुन्नस कमालीचा. छोटेसे कारण मारामारीत परिवर्तित होत असे. प्रेक्षकांना कोणताच धारबंद नसे. थेट मैदानात घुसत. रेफ्रीला मारहाण,प्रचंड दगड फेक,रणधुमाळी,शिवीगाळी,अशा अनेक बाबी सामानाच्या वेळी घडत. इतके होऊनही सामना परत चालू होत असे. शिवाजी-मंगळवार पेठेचे चोखंदळ प्रेक्षक जितके रसिक तितकेच क्षणात टोकाला जाणारे. या प्रेक्षकांच्या दबावाला घाबरून जाणारे रेफ्री सुद्धा बऱ्याच वेळा मैदान सोडून पळाले आहेत. जखमी झाले आहेत. म्हणूनच अशा आणीबाणीच्या काळी कै. कॅप्टन नारायनसिंग, कै. निजाम मोमीन या बेडर,करारी व धाडसी पंचाचे नाव आजही कोल्हापुरात मोठ्या कौतुकाने घेतले जाते. फुटबॉल प्रेक्षकांकडून अस्सल कोल्हापुरी शिवीचा उखळी बार केव्हा फुटेल आणि प्रेक्षकांत तणाव निर्माण होईल याचा नेम नाही. पण असे दंघेखोर प्रेक्षक आपल्या कृतीचे समर्थन करत रेफ्री,खेळाडू व पोलीस खाते यांची क्षमा मागच्या मागे पुढे पहात नसत.
2008 साली मारामाऱ्या,भांडणे असे प्रकार कमी झाले आहेत. मात्र आजच्या सामान्यांची गर्दी मात्र प्रेक्षकांचे फुटबॉल वरील अलोट प्रेमच दर्शीवते. सामना 5 वा. असेल तर दुपारी 3 वाजल्यापासूनच त्यांची मैदानावर चुळबुळ सुरूच. पूर्वी सामन्यास तिकीट नव्हते पण आता नाममात्र तिकिटाने सामने होतात. पण काही चोकांदळ फुकटे नजर चुकवून सामना पाहणारे कमी नाहीत. प्रसंगी प्रेक्षक खेळाडूंना खांद्यावर घेतात. सवाद्य मिरवणुका काढतात. आतषबाजी, पैशांच्या पैजांची खेळाडूंवर खैरात करणारे प्रेक्षक. प्रत्येक्ष मैदानात बकरी फिरवून त्यांच्या पैजा,कोंबडा,मुंडी व पाय प्रत्येक्ष मैदानात 10/10,15 किलोचा मासा पैजेखातर टांगणे,असले चोखंदळ,खट्याळ,खोडकर,रसिक प्रेक्षक पृथ्वीच्या पाठीवर फक्त कोल्हापुरातच सापडतील. अलीकडे मैदानावर प्रेक्षकांना आवर घळवण्याकरिता पोलीस फौज फाटा मोठ्याप्रमाणात असतो.
दूरदर्शन आले. जागतिक पातळीवरचे अव्वल दर्जाचे फुटबॉल सामने पहावयास मिळू लागले. तेव्हाच आपल्यातल्या उणिवांची जाणीव येथील रसिक प्रेक्षक व खेळाडूंना होऊ लागली. फुटबॉल खेळावर नुसतेच आंधळे प्रेम करून चालत नाही. त्यासाठी त्याग,प्रेरणा,प्रयत्न,आर्थिक पाठबळ,उत्कृष्ट प्रशिक्षक,खेळाडूंच्या भवितव्याची योजना या गोष्टी प्रेक्षकांना व खेळाडूंना कळू लागल्या. जागतिक स्तरावर,भारतीय फुटबॉल 108 व्या स्थानावर आहे हे समजताच कोल्हापुरी रसिक फुटबॉल प्रेक्षक संभ्रमात पडला तर नवल नाही!
विजय म्हणजे प्रतिस्पर्ध्या वर मात नव्हे,तर आपल्या उत्तमोत्तम खेळाचे सर्वांग सुंदर प्रदर्शन म्हणजे आपला खरा विजय हे समजले तरच फुटबॉल खेळात निर्दोष प्रगती होते. आणि हे उमगले तरच कोल्हापूरच्या फुटबॉल ला आंतरराष्ट्रीय स्तर नजीकच्या काळात दूर नाही प्रेक्षकांची आज हीच अपेक्षा आहे. कोल्हापुरात सन 1940 पासून कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन या नामांकित क्रीडा संस्थेद्वारा विविध खेळांसाठी सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यात फुटबॉल सामान्यकरीता सर्वोत्तम सुविधा असणारे बंदीस्त मैदान,सुरक्षित भव्य प्रेक्षक गॅलरी,विविध स्वतंत्र कक्ष,इत्यादी सोयी केल्या आहेत. म्हणून मी आता माझ्या इतर प्रेक्षक बांधवांना सांगू इच्छितो की,संयोजकानो,तुम्ही स्पर्धा बिनधास्त पार पाडा. पोलिसांची धावपळ बंद व्हावी,खेळाडू,रेफ्रीनो भिऊ नका आम्ही प्रेक्षक तुमच्या पाठीशी आहोत. सामने निर्धास्थ खेळा. आम्ही फक्त खिलाडू व रसिक वृत्तीने फुटबॉल सामन्याचा आनंद लुटू. तुमच्या सर्वांच्या कोल्हापुरातील एक चोखंदळ फुटबॉल वेडा प्रेक्षक....
No comments:
Post a Comment