Sunday, March 27, 2022

शाहू महाराजांची ससे शिकारी ची पैज..!

        ससा म्हणजे एक कोवळा, नाजूक, भित्रा, लुसलुशीत प्राणी...! या प्राण्याचे उत्पादन झपाट्याने होत असते. या प्राण्याची कितीही शिकार केली तरी शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी शाहू महाराजांकडे येतच असत. शाहू महाराजांनी शेतकरी हा आपल्या राज्याचा कणा मानला होता. त्याला कसलाही उपद्रव होऊ नये, त्याला कोणीही कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, याकडे महाराजांचे बारकाईने लक्ष असे. अशीच सशासंबंधी तक्रार महाराजांकडे आली. महाराजांनी शिकारीचा बेत रचला.


•याच वेळी सशाच्या शिकारीसाठी खुद्द आक्कासाहेब महाराज यायला इच्छुक होत्या. आक्कासाहेब महाराज म्हणजे महाराजांची कन्या! त्यादेखील घोड्यावर बसण्यात, अचूक गोळी झाडण्यात निष्णात होत्या. त्यामुळे आक्कासाहेब महाराजांना त्यांनी आपल्याबरोबर घेतले. सर्व जण खाशा मंडळींसह माळरानावर येऊन


थांबले. इतक्यात आक्कासाहेब महाराज म्हणाल्या, "आबासाहेब! आज आपली तुमच्याशी पैज!"


"कसली?" आश्चर्याने महाराज म्हणाले. "कसली काय ? आज ससे आपल्या दोघांत अधिक कोण मारतो ते पाहावयाचे!"


"ठीक आहे." महाराज अधिक काही बोलले नाहीत.


शिकारीला दोघेही उलट दिशेला गेले. मारलेले ससे गोळा करण्यासाठी महाराजांच्या बरोबर एक दलित हुजऱ्यापण होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत न थांबता, न विश्रांती घेता दोघांनीही ढीगभर ससे मारले व परत दोघेही एकत्र आले. सशांची मोजदाद सुरू झाली. महाराजांनी किती ससे मारले हे महाराजांना ठाऊक होते. आक्कासाहेब महाराजांनाही आपण किती ससे मारले हे त्यांनाही ठाऊक होते. परंतु मोजदाद पूर्ण झाल्यावर एक ससा कमी पडू लागला, हेमहाराजांच्या लक्षात आले. महाराज पुनः पुन्हा विचार करू लागले, एक सं गेलाच कोठे? एक ससा कमी पडत असल्यामुळे महाराज पैज हरत आहेत, हे पाहिल्याने आक्कासाहेबांना आनंद आवरला नाही. त्या म्हणाल्या,


"आबासाहेब आता तरी कबूल करा. आम्ही पैज जिंकली. " • महाराज पैज हरल्याची कबुली द्यावयास तयार नव्हते. ससे मोजण्यात काहीतरी गफलत झाली असावी, असेच त्यांना वाटत होते. यासाठी पुनश्च एकदा सशांची मोजदाद करण्यात आली. परत एकच ससा कमी पडू लागला महाराजांनी आपला पराभव अखेर स्वीकारायचे ठरवले. पराभव स्वीकार करण्याची पाळी आली हे पाहून महाराजांची अस्वस्थता तीव्र झाली.


महाराजांची ही अस्वस्थता पाहून महाराजांबरोबर ससे गोळा करण्यासाठी जो दलित हुजऱ्या गेला होता, तो मारलेल्या सशांभोवती फेर धरून उभ्या राहिलेल्या मंडळींतून अचानक बाहेर आला व म्हणाला,


"थांबा! आमचे महाराज कधीच हरणार नाहीत." सर्व जण त्याच्याकडे


आश्चर्यानेच पाहू लागले. "ते कसे काय ?" आक्कासाहेबांच्या हुजन्याने प्रतिआवाज दिला. "महाराज! दया करा, मी पापी आहे. माझ्या राजाच्या इभ्रतीची जाण न


ठेवून त्यातील एक ससा मी दडवून ठेवला आहे. मला फाशी द्या महाराज." असे


म्हणून तो ओक्साबोक्शी रडू लागला.


""ओरडायला काय झालय?" ससा घेतलास म्हणून फाशी द्यायला ही काय मोंगलाई आहे का? असं हे तुमचंच राज्य आहे." महाराज असे म्हणताच परत त्या हुजऱ्याच्या डोळ्यांतून अधिक गतीने अश्रू वाहू लागले. रडता रडता तो पुढे म्हणाला,


"सशाचं मांस मी कधी खाल्लं नव्हतं म्हणून मला ससा दडविण्याची इच्छा झाली. परंतु माझ्यामुळे महाराज पैज हरतात हे पाहून चोरी कबूल केली." त्याची चोरी करण्याची बुद्धी व चोरीची कबुली यातील प्रामाणिकपणा व आपल्यावरील नितांत प्रेम पाहून महाराजाचे हृदय हेलावले व त्यांनी त्वरित त्यातील आणखी एक ससा व तेलमसाल्यासाठी पाच रुपये त्याला दिले.