Monday, February 14, 2022

खजिन्यावरचा गणपती

      महालक्ष्मीच्या अंगावरील सर्व अलंकार सकाळी ताब्यात घ्यायचे आणि रात्री शेजारती झाली की, सारे अलंकार खजिनदाराच्या ताब्यात द्यायचे, ही पिढ्यान्पिढ्याची पद्धत, हे अलंकार खजिनदाराने मंदिरातील एका खोलीत ठेवायचे. अमूल्य किमतीचा हा ठेवा त्याने रात्रभर मंदिरात रात्रभर एकटं राहून जपायचा. शंकरमामा काळे हे १८९० च्या सुमारास देवीची व्यवस्था पाहायचे. त्या वेळी अंबाबाईच्या खजिन्यात गणेश चतुर्थीला गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना व्हायची. शंकरमामांनी या गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेला सार्वजनिक स्वरूप दिलं आणि खजिन्यावरचा हा गणपती श्री महालक्ष्मीचा गणपती म्हणून ओळखू जाऊ लागला. आज ११४ वर्ष उलटलो. महालक्ष्मीचा गणपती म्हणून वेगळी ओळख आणि मूळ परंपरा जपत मंदिरातला हा गणेशोत्सव साजरा होत आहे.

'खजिन्यावरचा गणपती' ह्या मूळ नावाने ओळखला जाणारा महालक्ष्मी भक्त मंडळाची मूर्ती


खजिन्यावरचा हा गणपती काही वर्षांनी सरस्वती मंदिराजवळ आला व तेथून पुढे त्याला गरुड मंडपात स्थान मिळाले. या गणपतीच्या सोहळ्याला संस्थानाकडून हत्ती, घोडे, उंट, हुजरे असा लवाजमा मिळू लागला व सोहळ्याचे स्वरूप भव्यदिव्य होत गेले. गरुड मंडपात सोहळ्याच्या सजावटीसाठी हंड्या, पताका, सिंहदालन, कमानीचा वापर होऊ लागला. शंकर मामा काळे यांच्याबरोबरच मोरबा दीक्षित, हरिभाऊ सेवेकरी, हवालदार (खांडेकर), मुनिश्वर या कुटुंबातील मंडळीही उत्सवात सहभागी होऊ लागली.


गरुड मंडपाच्या तुलनेत खजिन्यावरच्या या गणेशमूर्तीची उंची लहान वाटू लागली मग मूर्तीची उंची वाढविण्याचा निर्णय झाला. उत्सवात सुसूत्रता यावी म्हणून विश्वनाथ बावडेकर, शंकरराव मेवेकरी, वसंतराव वाघ, नारायण किणीकर यांनी पुढाकार घेऊन महालक्ष्मी भक्त गणेश मंडळ स्थापन केले व या सोहळ्याचे स्वरूप अधिक व्यापक झाले.


महालक्ष्मी मंदिरासमोरच्या गरुड मंडपातला गणेशोत्सवाचा सोहळा म्हणजे प्रथापरंपरेचे काटेकोरपणे केलेले जतन मानले जाते. पहाटे या सोहळ्याच्या ठिकाणी सनई-चौघडा वादन होते. महालक्ष्मीच्या या गणेश मूर्तीचा विसर्जन मिरवणुकीतही मान मोठा. ही मूर्ती रथातून भाविक ओढून नेतात. विसर्जन मिरवणुकीत मी पुढे की तू पुढे, हा कोल्हापुरातला पारंपरिक वाद या मूर्तीला कधीच लागू झालेला नाही. सायंकाळी सहा साडेसहाच्या सुमारास ही गणेशमूर्ती विसर्जनासाठी रथातून बाहेर काढली की, महाद्वार रस्त्यावर मूळ मिरवणूक काही काळ थांबते व या मूर्तीला वाट दिली जाते. मिरवणुकीत शेवटपर्यंत एक पेटलेली दिवटी व घंटानाद कायम असते.


कोल्हापूरच्या धार्मिक परंपरेतील एक पाऊलखुणच यानिमित्ताने जपली गेली आहे.