शहराभोवतीच्या तटबंदीचा घेर पावणेदोन मैल, उंची तीस फूट, रुंदी दहापासून सव्वीस फूट, तटबंदीवर ४५ बुरूज, तयभोवती खोल खंदक व तो पाण्याने भरलेला. तटाच्या आत येण्यास सहा वेशी. या वेशी ठराविक वेळेतंतर बंद, वेशी बंद झाल्या की, आत प्रवेश केवळ अपवादात्मक परिस्थितीतच, कोल्हापूर शहराभोवती १८८९ पर्यंत असलेल्या तटबंदीचे हे वर्णन, या तटबंदीच्या आत काही काळ शहर सुरक्षित राहिले. नंतर तटबंदीच्या आत शहर घुसमटले. तटबंदीच्या मर्यादिमुळे तटाबाहेरच जुळे शहर वसले व १८८९ नंतर तटबंदी पाडल्याने शहर ख-्या अर्थनि विस्तारले.१७८८ साली करवीर संस्थानची राजधानी पन्हाळ्याहून कोल्हापुरात आली. महालक्ष्मी मंदिराच्या परिसरातच वस्ती दाटीवाटीने झाल्याने राजवाड्याची जागाही त्याच परिसरात निवडली गेली. सुरक्षिततेचा भाग म्हणून शहराभोवती दगडी तट बांधला गेला. तटाचा विस्तारच सांगायचा झाला तर रविवार वेस (बिंदू चौक), विल्सन रोड (शिवाजी रोड), चांभार लाईन, पापाची तिकटी, गंगावेस, रंकाळवेस, तटाकड़ील तालीम, वरुणतीर्थ वेस, खरी कॉर्नर, मंगळवार वेस (मिरजकर तिकटी) ते परत रविवार वेस असा त्याचा घेरा राहिला. रविवार वेस, शनिवार वेस, मंगळवार वेस, वरुणतीर्थ वेस, गंगावेस, रंकाळवेस असे वेशीचे सहा दरवाजे राहिले. रविवार वेस म्हणजे सध्याचा बिंदू चौक. तेथे अजून तटबंदीचे अवशेष आहेत; पण तटाची कमान ही मूळ कमान नव्हे. आता असलेल्या कमानीशेजारी मुजवलेली जी कमान आहे ती प्रवेशद्वाराची मूळ कमान, शनिवार वेस म्हणजे शिवाजी पुतळा ते पापाची तिकटीचा परिसर. वरुणतीर्थ वेस अर्ध्या शिवाजी पुतळ्यासमोर मारुतीचे मंदिर आहे त्या शेजारी व मंगळवार वेस मिरजकर तिकटीला.
रविवार वेशीजवळच जुना तुरुंग. या वेशीच्या समोरील खंदकात एका टेकडावर शेषशायी विष्णूचे मंदिर, हे मंदिर हलवून त्यातील शेषशायीची मूर्ती आता मिरजकर तिकटीला एका मंदिरात आहे व मूळ मंदिर ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी कैद्यासाठी भाजीपाल्याची लागवड केली आहे, आळूची बाग म्हणूनही हा भाग परिचित आहे. या ठिकाणी असलेल्या एका बुरुजावर धोकादायक कैद्यांसाठी अंधार कोठडी व त्यापुढील बुरुजावर म्हणजे बालगोपालच्या पिछाडीस खोडा घातलेल्या कैद्यांसाठीची जागा आहे. खोडा म्हणजे हातापायात बेड्या व हात मागे बांधलेले. यापैकी एक बुरूज आता ढासळला आहे. आता हा बुरूज म्हणजे पतंग उडविण्यासाठीची सार्वजनिक जागा आहे. या बुरुजामागे बाराईमाम दैवताचे एक स्थान चक्क कारागृहाच्या आवारात आहे.
शनिवार वेस ते रविवार वेस या परिसरात जो खंदक होता, त्यात आठवडा बाजार भरत असे. असाच बाजार कपिलतीर्थाच्या परिसरात एका पत्र्याचे छप्पर असलेल्या शेडमध्ये भरत होता. विल्सन पुलाजवळ (शिवाजी चौक)
खंदकातही बाजार भरत होता. कर्नल फेरीसने तेथे नियोजनपूर्वक मंडई बांधली. फेरीस मार्केट असेच या मंडईला नाव दिले गेले. या मार्केटच्या प्रवेशद्वारावर एक सुंदर दगडी कमान उभी करण्यात आली. अलीकडे हे मार्केट पाडून तेथे शिवाजी मार्केटची इमारत उभी करण्यात आली व फेरीस मार्केटची दगडी कमान केशवराव भोसले नाट्यगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभी करण्यात आली. या कमानीवर अजूनही फेरीस मार्केटच्या अनावरणाचा संगमरवरी फलक आहे.
तटबंदीच्या आत कपिलतीर्थ, खंबाळा, सेजाळ तळे, इंद्रकुंड, काशी मनकर्णिका कुंड ही तळी होती, तर राजवाड्यासभोवती कागलकर, राजाज्ञा, खड्डेकर, हिम्मतबहाहर चव्हाण गुरू महाराज, यादव, पाटणकर, जीववा नाना जाधव, भाऊमहाराज, पारसनीस, जोशीराव, नागपूरकर यांचे वाडे होते. याशिवाय कलावंतीणीची आळी (कसबा गेट ते गंगावेस), कुंभार गल्ली, पाटील आळी, बाबूजमाल, खंबाळा, मोमीन गल्ली, सुतार आळी, गुरव गल्ली, देशपांडे गल्ली, अवचितपीर, खरी गल्ली, रंकोबा मंदिर, कसबेकर वाडा, भाऊ नाईक, माने, गावकामगार पाटील, कुंभोजकरवाडा, आयरेकर गल्ली, चव्हाण पाटणकर, राजापूरकर आळी, मिठारी बोळ, फडणीस बोळ, भेंडे गल्ली, हुजूर गल्ली, पटवेगार व जिनगर गल्ली, फडनाईक, पानारी, सुतार, हकीम, नालबंद आळी, म्हेतर, माळी, आळी, पत्की बोळ, ब्राह्मणपुरी, बागणीकर वाडा, आझाद गल्ली, खाडे वाडा, खाटीक गल्ली, ओतारी आळी, परीट गल्ली अशी वस्ती होती. मिरजकर तिकटीच्या विठ्ठल मंदिरात धर्मशाळा होती.
तटबंदीबाहेर पद्माळा, शेरीबाग (जयप्रभासमोरचा भाग), बेलबाग, खासबाग, चौफाळे माळ (दसरा चौक), मीराबाग, जीवबा नाना जाधवांची बाग, सरकारी बाग, नर्सरी, देवगिरी मठ, लालगिरी बाग, धोत्री बाग, हत्तीमहाल, बावडेकर बाग, हत्ती बाग (पद्माळा) इनामदार बाग (बाबूजमालजवळ), शिगोशी तलाव, भंगी आळी, खुळ्याची चावडी, उपाध्ये बुवा बोळ, खर्डेकर बाग, आंबी (नावाडी) वसाहत, परीट, शिपी, कुंभार, तेली, वाणी, न्हावी, वडार, लोणार, कलकुटकी, गवळी गोसावी यांची वस्ती होती. तटाच्या आत तर इतकी दाट वस्ती होती की, तटबंदीच्या आतले शहर म्हणजे रोगराईची खाण मानले जात होते. संस्थानचे कारभारी दाजी कृष्णा पंडित यांनी कोल्हापूर हे दक्षिण काशी म्हणून काशीतल्या गल्ली-बोळासारखे दगडी फरशीचे रस्ते बहुतेक ठिकाणी केले होते. अजूनही काही भागांतील छोट्या बोळांत हे फरशीचे रस्ते आहेत. बहुतेक घरे एकमजली खापऱ्याची होती. सांडपाण्याची निर्गत करण्याची सोय नव्हती. बुट्टीचे संडास होते. सांडपाणी दारात सोडायचे व ती घाण झाकण्यासाठी त्यात कर्दळी किंवा आळू लावायची प्रथा होती.



